Pratibimb

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

तिचे काय चुकले ?

तिचे काय चुकले ?
नांव माया. दिसायला आकर्षक नसली तरी स्वभावाने गोड होती. बोलणे आणि वागणे एवढे लोभस होते कि समोरच्यावर छाप पडायलाच हवी. म्हणूनच तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ती हवी-हवीशी वाटायची. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अनेकांनी तिच्याकडे प्रेमाची मागणीही केली होती. पण ती साफ नकार द्यायची. लग्नाच्या उंबरठ्यावर उभी असतानाच एका पुरुषाशी तिची ओळख झाली. विशाल त्याचे नांव. तो तिच्याच कुणीतरी लांबच्या नात्यातला होता. तिच्यापेक्षा ७-८ वर्षांनी मोठा असेल. विशालच्या लग्नाला आता ४ वर्ष पूर्ण झाली होती. दोघानाही एकमेकांचे स्वभाव खूप आवडले आणि छान मैत्री झाली. महिन्यातून एकदा भेटणेही होऊ लागले. सहवास हवा हवासा वाटू लागला. घरात चांगली पत्नी असतानाही त्याचे मन नेहमी तिच्यातच गुंतून राहू लागले. तिच्यातही अचानकपणे बदल दिसायला लागले.
कशीतरी हिम्मत करून विशालने मायाला प्रपोज केले. तिलाही कदाचित तेच हवे होते म्हणून चटकन होकार दिला. दोघानाही आकाश ठेंगणे झाले. आता ते निर्धास्त झाले. दिवसातून ४ वेळा फोन वर बोलल्या शिवाय चैनच पडत नव्हते.
आत्तापर्यंत अर्धा डझन मुलांना नकार दिला होता आणि अशी अचानक लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात कशी पडली तिचे तिलाच आश्चर्य वाटायचे. ती म्हणायची कि प्रेमाला नेहमी ’लफड’ समजायची, तशा लोकांकडे नेहमी हीन दृष्टीने बघायची. पण आज मला कळले कि खर्या प्रेमात काय सुख असते. भेटण्यासाठी, बोलण्यासाठी, बघण्यासाठी मनाची जी तडफड होते त्यात सुद्धा सुखच असते याची अनुभूती यायला लागली. अजूनही तो ब्याचलरच आहे असा तिला भास व्हायचा.
विशालचे लग्न झाले होते म्हणून आपले हे प्रेम कधीही पूर्णत्वास जाणार नाही याची दोघानाही शाश्वती होती. पण प्रेम करणे सोडतील ते प्रेमीयुगुल कसले ? नशिबात असेल ते पुढे बघू म्हणून दुर्लक्ष करायचे. आपल्या अशा वागण्याने घरच्या लोकांना कसलाही त्रास व्हायला नको म्हणून खबरदारी घ्यायचे. आपण जे करतोय ते खूप चुकीचे आहे याची दोघानाही जाणीव होतीच. पण म्हणतात ना कि कळत होते पण वळत नव्हते. अशातच काही दिवस निघून गेले.
माया खूपच भावनिक होती, घरच्या लोकांना अंधारात ठेऊन आपण विश्वासघात करतोय असे तिला वाटू लागले. त्यांना शरमेने खाली मन घालावी लागेल अशी कोणतीही गोष्ट तिने विशाल सोबत केली नव्हती, याचा तिला जेवढा आनंद झाला तेवढाच मनस्ताप तिला त्यासोबत प्रेम करण्याचा होऊ लागला.
प्रत्येकवेळी धैर्याने वागणारी, कधीही कुणाला न घाबरणारी माया आज अचानक हळवी झाली. त्यानेही तिच्यावर खूप प्रेम केले होते म्हणून त्याला नकार देण्यास ती घाबरत होती. पण हीच गोष्ट जगाला माहित झाल्यावर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे तील वाटू लागले.
विशालने आपल्या भोळेपणाचा फायदा घेऊन आपल्याला फसवले असे तिला वाटायचे. तो एक लग्न झालेला पुरुष आहे त्याला कोण बोलणार ? आणि किती दिवस ? पण माझे काय ? लोक काय काय म्हणतील ?
शेवटी तिने निर्णय घेतलाच. आता यापुढे त्याच्यासोबत प्रेमाचे संबध ठेवायचेच नाहीत. तिचे भेटणे आणि फोनही बंद झाले. कुठलाही प्रतिसाद ती देत नव्हती, काही दिवसा नंतर आपण हे सगळे विसरू असे तिला वाटले.
तिच्या वागण्यातला बदल त्याच्या लक्षात केव्हाच आला होता. अनेकवेळा विचारूनही ती काहीच सांगायला तयार नव्हती. पण यापुढे मी प्रेम करू शकणार नाही एवढे म्हणायची. याचा विशालच्या मनावर खूप मोठा आघात झाला. ती आपल्यावर प्रेम करतनसेल तर जगायचे कशासाठी असे त्याला वाटू लागले. आपल्यासोबत मायाने प्रेमाचे नाटक केले, ती आपल्या भावनाशी खेळली असे त्याचे पक्के मत झाले. एवढ होऊनही ती मात्र अजूनही मैत्री करण्यास तयार होती. मला एक चांगला मित्र गमवायचा नाही असे ती म्हणायची. पण त्याने मैत्रीस साफ नकार दिला. कारण आयुष्यात तिचे कधीही तोंड बघणार नाही असा संकल्पच त्याने केला होता. एकमेकांना जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोघांमध्ये आज संशयाचे वावटळ उठले होते. असे असले तरी ते एकमेकांना कधीही विसरू शकणार नव्हते.


मित्रांनो अशा प्रकारच्या घटना जगात खूप पाहायला मिळतात. आपण ऐकतो आणि विसरतो. मित्रांसोबत घडली असेल तर शहाणपणाचे दोन शब्द सुनावतो. आणि स्वत बाबतीत घडली तर...................???
प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: