Pratibimb

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

मनातले मनापासून ..............

मनातले मनापासून ..............

एका लहान खेडेगावात माझा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. आई-वडील शेतात मजुरी करायचे, त्याच परीस्थित शिक्षण झाले. शहरातले जीवन, चालीरीती, सभ्यता ! या गावापेक्षा थोड्या भिन्न असल्या तरी प्रत्यक्ष पाहण्याचा व अनुभवण्याचा योग कधीच आला नव्हता. घरात एकटा मुलगा असल्याने परिस्थिती नसली तरी शक्य तेवढ्या लाडाने वाढवले होते.शेती नसल्यासारखीच असल्यामुळे कधीतरी शहरात जाऊन कारकुनी करावी लागणार हे पक्के माहित होते. इच्छा नसतानाही मी त्या दिवसाची वाट पाहत होतो. कारण ग्र्याजुएशन पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी नोकरी नव्हती व मुलगा एवढा शिकला तरी अजून घरीच आहे अशी लोकांची बोलणी ऐकावी लागायची.
शेवटी तो दिवस जवळ आला. एका ओळखीच्या माणसाने शहरात नोकरी दिली. माझ्याबरोबर सगळ्यांना खूप आनंद झाला. पण दिवस जवळ यायला लागला तशी उदासीनता वाढायला लागली. आई, वडील, भाऊ, बहिण, मित्र, गाव, शेती, निसर्ग ह्यांपासून दूर जाणार होतो. सासरी जाणार्या मुलीसारखी अवस्था झाली...मन खूप हळवे आणि संवेदनशी होतेना म्हणून कदाचित...पण मुलगा असल्यामुळे त्या परीस्थित रडताही येत नव्हते.
निरोप देण्यासाठी वडील शहरापर्यंत आले. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम पण आम्ही दोघेही कमी बोलणारे त्यामुळे अशा परिस्थितीत अजूनही शांत झालो. मनात कालवाकालव सुरु झाली, मन उचंबळून आले. सावकाराकडून आणलेले दोन हजार रुपये त्यांनी माझ्या हातावर ठेवले. निरोप देण्यासाठी त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता...(आणि तो फुटलाच असता तर त्या अगोदर अश्रू आले असते) हे मला कळले आणि ते तसेच न बोलता निघून गेले.त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे मी बघतच होतो..सर्व जीवनपट डोळ्यासमोर आला आणि मन भरून आले. आपण काहीतरी पाप केलाय त्यामुळे हि ताटातूट होतेय असे वाटले. असेच त्यांच्याबरोबर घरी निघून जावे असे वाटत होते.
शहरामध्ये नातेवाईक असले तरी त्यांच्याकडे राहायचे नाही असा सुरुवातीपासूनच निर्णय घेतल्यामुळे मित्रांमध्ये राहण्याची व्यवस्था केली.
नोकरीचा पहिलाच दिवस होता... तिथल्या लोकांची राहणी, बोलणे, हावभाव, कामाची पद्धत हे सर्व पाहून मनात न्यूनगंड निर्माण झाला. माझे राहणीमान एकदम साधे (गावठी) नवीन कपडे पण तेही जुन्या पद्धतीचे शिवलेले, विन न केलेली, पायात चप्पल, दाढी थोडी वाढलेली, प्रकृती सडपातळ...
क्वालेजात असतानाही माझी राहणी अशीच होती. झकपक राहण्यासाठी पैसा हवा होता आणि सुरुवातीपासूनच तो आमच्यावर नाराज होता. माझे विचार चांगले आहेत मग राहणीमान साधे असले तरी चालेल असा माझा समाज होता. (तो खरा असला तरी येथे कामात येणार नव्हता हे मला खूप उशिरा कळाले)
माझ्या ब्वास ह्या पंजाबी होत्या, त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व.. त्याचाही मला खूप त्रास झाला. माझ्यापेक्षाही थोडा जास्त अनुभव असलेल्या तीन बाया, त्या तिघीही स्वताल माझ्या ब्वासच समजायच्या. मनात येईल तशा बोलायच्या. खूप मनस्ताप होत होता. समजून घ्यायला कुणीच तयार नव्हते. कुठून यांच्यात अडकलो असे वाटायचे. यावेळी गावाकडची खूप आठवण यायची.
एक गोष्ट आहे ती इकडे सांगावी कि नाही याचा खूप विचार केला पण मी ती कधीच विसरू शकत नाही.नोकरीच्या पहिल्याच दिवशी बाईने वरच्या मजल्यावरील गोडाऊन मधून काही पेपर्स आणायला सांगितले, ते शोधायला मला दोन तास लागले. ते फ़ाईलच्या अगदी तळाशी असल्याने आणि मला फ़ाईल ओपन कशी करावी हे माहित नसल्यामुळे तसेच बाहेर ओढून काढले. त्यांची अवस्था पाहून त्या बिचार्यांना हसावे कि रडावे हेच काळात नव्हते. पण मला त्याचे अजूनही खूप वाईट वाटते.
एका दिवशी त्यांनी बाहेरून जेवण मागवले व ते आणण्यासाठी मला पाठवले. त्यावेळी खूप संताप झाला, स्वताची चीड आली. कोणत्याही परीस्थित कोणासमोर वाकणार नाही असा निश्चय केला होता पण इथेतर आपण यांची गुलामीच करतोय असे वाटायला लागले. आत्ताच त्यांना खडसावून सांगावे आणि अशा नोकरीला लाथ मारून निघून जावे असे वाटले. पण पुढे काय ???...मोठ्या मुश्किलीने एक नोकरी मिळाली आणि तीही अविचाराने घालवली तर..... खूप रडू आले.
लांबच्या नात्यातले मोठे भाऊ आहेत त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितले कि स्वताला कमी समजू नकोस, त्यांची वैयक्तिक कामे करावी लागतात याचा अर्थ तू त्यांच्यासमोर हलका ठरतोस असा अर्थ नको घेऊ. ती तुझात असणारी नम्रता आहे, चांगुलपणा आहे असे समजून काम कर..
सुरुवातीला खिशात पैसे नव्हते म्हणून पंधरा दिवस फक्त एक वेळ पाववडे खायचो. ऑफिसातली मुलगी म्हणायची कि मी तुमचा डबा आणत जाइन पण कुणाकडून काहीही घ्यायचे नाही म्हणून नकार दिला. पगार झाल्यानंतर रूम पार्टनर्स चे घरभाडे मीच देऊन टाकायचो जे अजूनपर्यंत मला परत मिळालेच नाही.
गावाकडची खूप आठवण यायची. महिन्यातून एकदा जायचो. खूप आनंद व्हायचा. आई काहीनाकाही देताच रहायची. निघताना गलबलून येत होत, पाय पुढे रेटत नव्हते. काहीतरी बहाणा करून प्रत्येकवेळी एक दिवसाची रजा वाढवायचो.
मी आता बदलतोय, राहणीमानही बर्यापैकी सुधारलेय, हाताशी येईल ते काम करण्याचे ठरवले आहे. आता माल कशाचा कमीपणा व अपमानही वाटत नाही. प्रत्येक वेळी मानाने विचार न करता तटस्थपणे राहायचे ठरवले आहे. संवेदनशील न राहता जास्तीत जास्त प्रोफेशनल कसे बनता येईल याचाच विचार करत आहे. मला आता गावाकडे करमत नाही. तिकडचे लोक म्हणतात कि "तू शहर्म्हा र्हैसनी बदली गया रे"  जे घडत आहे ते चांगले नाही असे वाटतेय पण ती एक काळाची गरज असेल कदाचित.................

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

malahi aata gawakade krmt nahi.aai wadila sathi jato.Ata tithlya lokana aapn shahari wat to.Tumche likhaan aaple watle.

राजेंद्र अहिरे म्हणाले...

मी बर्याच दिवसापासून शहरात रहात असल्यामुळे इकडचाच झालोय. महिन्यातून एकदा गांवाकडे जातो.
धन्यवाद !!!!