Pratibimb

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

झपाट्याने बदलणारी खेडी

परवा रात्रीच गावावरून आलो. २-३ महिन्यात एकदा तरी भेट देतोच. बालपण तिकडे गेल्यामुळे विशेष आकर्षण अजूनही आहेच. पण गेल्या ७-८ वर्षांपासून खूप झपाट्याने बदल झालेले दिसतात. शहरातल्या सुख-चैनी आता तिकडे सुद्धा पोहोचल्या आहेत. सर्वच मातीच्या घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. शेतकर्यांना आता शेतात जाण्यासाठी सायकली किंवा बैलगाडी ची आवश्यकता नाही प्रत्येकाकडे मोटारसायकली आहेतच. सूर्योदयापूर्वी शेतात जाणारा शेतकरी आज ११ वाजेपर्यंत घरीच दिसतो. शहराप्रमाणे कमी कामात जास्त दाम घेण्याची वृत्ती आज तिकडेही दिसून येते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आल्यामुळे गाणे डाऊनलोड करून ऐकण्यातच बराचसा वेळ जातो. घरोघरी रंगीत टीव्ही आल्या आहेत. आता त्यानाही सगळ्या चानेल्स ची नांवे माहित आहेत. एकाही मुलगा मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. तासंतास टीव्ही पुढेच बसलेला दिसतो. दिवाळी, होळी, अक्षयतृतीया, रंगपंचमी, नागपंचमी यासारखे सगळे सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करणाऱ्या खेड्यांमध्ये आज सामसूम दिसते.
जगाप्रमाणे आज खेडे गांवातही प्रगती होताना दिसत आहे. हजारो वर्ष गुरांप्रमाणे राबणारा व दुसर्यांना सुखी करणारा शेतकरी व मजूर वर्गाला सुखी बघून आनंदच होईल. यांत्रिक प्रगती सोबतच माणसाची मानसिक अधोगती होताना दिसते ती तिकडे नाही झाली तरच तो आनंद टिकून राहील. जगात सगळ्यात जुनी व भव्य अशी भारतीय संस्कृती आजही थोड्या प्रमाणात खेड्यातच पाहायला मिळते. पुढचे माहित नाही.......

गुरुवार, २० जानेवारी, २०११

नविन वर्षाचे ठराव !!!! फूस्स्स..........................

प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मी चार ठराव पास केले आहेत. पण गेल्या वीस दिवसात चार पैकी फक्त दोनच पूर्ण करू शकलो.... हे असे नेहमीचेच आहे. माझ्या सगळ्या मित्रांचे सुद्धा असेच होते. वास्तविक बघितले तर वाईट गोष्टी सोडण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसतेच. पण तरीही प्रत्येक जानेवारी महिन्यात (मराठी नसला तरी) जवळ जवळ सगळेच लोकं नवनवीन रिझोल्युशन बनवतात आणि ठराविक लोकच (बोटावर मोजण्या इतकेच) ते पूर्ण करतात.
सकाळी उठून फिरायला जाईन असे ठरवलेल्याना एखाद्या दिवशी थंडी असल्यामुळे कंटाळा येतो, बाहेरचे तेलकट खाणार नाही असे म्हणणार्यांना चटपटीत खाद्य समोर आल्यावर राहवत नाही, पुस्तकाचे दररोज दोन पान तरी वाचेन असे म्हणणार्यांना झोप येते.
ठरवलेली गोष्ट आज नाही केली तर कुठे काय बिघडणार आहे !!! असे म्हणून सगळे ठराव आपण बासनात गुंडाळून ठेवतो ते पुढील वर्षी पूर्ण करण्यासाठीच...रोजच्या सवयी बदलणे अशक्य वाटते कारण कंटाळा हा माणसाच्या मनात असा रुतून बसलाय कि त्याला घालवणे सहजा सहजी शक्यच होत नाही.
थोड्या प्रयत्नांनी कोणतीही गोष्ट आपण अगदी सहज आत्मसात करू शकतो पण आळसामुळे ती कधीही शक्य होत नाही. ज्या गोष्टी आपण करण्याचे / सोडण्याचे ठरवतो त्या आपण कधी सिरीयस घेतच नाही म्हणूनच आपण त्या पूर्ण करू शकत नाही. आळस हा माणसाचा खरच खूप मोठा शत्रू आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.