Pratibimb

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

ती जन्मताच आंधळी

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.
आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरच न टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.

ह्यात एकच समाधानाची बाब
म्हणजे तिचा प्रियकर.
तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा,
तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.
मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.
तिने कित्येक वेळेस त्याला म्हटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवटपर्यंत साथ दिली असती."
आणि अचानक एके दिवशी चमत्कार झाला.
कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.
शेवटी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दिला दिसू लागले.
सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.
त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.
तो चक्क आंधळा होता.
तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"
तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.
त्याने काहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.
तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."

ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली.

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

झपाट्याने बदलणारी खेडी

परवा रात्रीच गावावरून आलो. २-३ महिन्यात एकदा तरी भेट देतोच. बालपण तिकडे गेल्यामुळे विशेष आकर्षण अजूनही आहेच. पण गेल्या ७-८ वर्षांपासून खूप झपाट्याने बदल झालेले दिसतात. शहरातल्या सुख-चैनी आता तिकडे सुद्धा पोहोचल्या आहेत. सर्वच मातीच्या घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतली आहे. शेतकर्यांना आता शेतात जाण्यासाठी सायकली किंवा बैलगाडी ची आवश्यकता नाही प्रत्येकाकडे मोटारसायकली आहेतच. सूर्योदयापूर्वी शेतात जाणारा शेतकरी आज ११ वाजेपर्यंत घरीच दिसतो. शहराप्रमाणे कमी कामात जास्त दाम घेण्याची वृत्ती आज तिकडेही दिसून येते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आल्यामुळे गाणे डाऊनलोड करून ऐकण्यातच बराचसा वेळ जातो. घरोघरी रंगीत टीव्ही आल्या आहेत. आता त्यानाही सगळ्या चानेल्स ची नांवे माहित आहेत. एकाही मुलगा मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. तासंतास टीव्ही पुढेच बसलेला दिसतो. दिवाळी, होळी, अक्षयतृतीया, रंगपंचमी, नागपंचमी यासारखे सगळे सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करणाऱ्या खेड्यांमध्ये आज सामसूम दिसते.
जगाप्रमाणे आज खेडे गांवातही प्रगती होताना दिसत आहे. हजारो वर्ष गुरांप्रमाणे राबणारा व दुसर्यांना सुखी करणारा शेतकरी व मजूर वर्गाला सुखी बघून आनंदच होईल. यांत्रिक प्रगती सोबतच माणसाची मानसिक अधोगती होताना दिसते ती तिकडे नाही झाली तरच तो आनंद टिकून राहील. जगात सगळ्यात जुनी व भव्य अशी भारतीय संस्कृती आजही थोड्या प्रमाणात खेड्यातच पाहायला मिळते. पुढचे माहित नाही.......

गुरुवार, २० जानेवारी, २०११

नविन वर्षाचे ठराव !!!! फूस्स्स..........................

प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मी चार ठराव पास केले आहेत. पण गेल्या वीस दिवसात चार पैकी फक्त दोनच पूर्ण करू शकलो.... हे असे नेहमीचेच आहे. माझ्या सगळ्या मित्रांचे सुद्धा असेच होते. वास्तविक बघितले तर वाईट गोष्टी सोडण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसतेच. पण तरीही प्रत्येक जानेवारी महिन्यात (मराठी नसला तरी) जवळ जवळ सगळेच लोकं नवनवीन रिझोल्युशन बनवतात आणि ठराविक लोकच (बोटावर मोजण्या इतकेच) ते पूर्ण करतात.
सकाळी उठून फिरायला जाईन असे ठरवलेल्याना एखाद्या दिवशी थंडी असल्यामुळे कंटाळा येतो, बाहेरचे तेलकट खाणार नाही असे म्हणणार्यांना चटपटीत खाद्य समोर आल्यावर राहवत नाही, पुस्तकाचे दररोज दोन पान तरी वाचेन असे म्हणणार्यांना झोप येते.
ठरवलेली गोष्ट आज नाही केली तर कुठे काय बिघडणार आहे !!! असे म्हणून सगळे ठराव आपण बासनात गुंडाळून ठेवतो ते पुढील वर्षी पूर्ण करण्यासाठीच...रोजच्या सवयी बदलणे अशक्य वाटते कारण कंटाळा हा माणसाच्या मनात असा रुतून बसलाय कि त्याला घालवणे सहजा सहजी शक्यच होत नाही.
थोड्या प्रयत्नांनी कोणतीही गोष्ट आपण अगदी सहज आत्मसात करू शकतो पण आळसामुळे ती कधीही शक्य होत नाही. ज्या गोष्टी आपण करण्याचे / सोडण्याचे ठरवतो त्या आपण कधी सिरीयस घेतच नाही म्हणूनच आपण त्या पूर्ण करू शकत नाही. आळस हा माणसाचा खरच खूप मोठा शत्रू आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

***आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ***
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
new year scraps greetings for orkut
new year scraps greetings for orkut 

मराठी माणूस जागा हो....

टीप :- वरील लेख माझा नाही. मला तो मित्राने मेल ने पाठवला आहे. लेखाचा मूळ मालक माहित नाही म्हणून त्यांचे नांव दिले नाही. ते कोण आहेत हे समजल्यास त्यांचे नांव देण्यात येईल किंवा त्यांनी काही हरकत घेतल्यास काढून टाकण्यात येईल.

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०

काही लोकांच्या विचित्र सवयी

काही लोकांच्या विचित्र सवयी
मित्रांनो,
प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सवयीन्प्रमाणे काही वाईट सवयी असू शकतात. ज्या दुसर्यांनी सांगितल्या शिवाय आपल्या लक्षात येत नाहीत. लहानपणी लागलेल्या काही सवयी ह्या मोठे झाल्यानंतर आपोआप निघून जातात तर काही सवयी तारुण्यात किंवा म्हातारपणी लागतात. नकळत लागलेल्या सवयी ह्या थोड्या प्रयत्नांनी घालवणे जरी शक्य असले तरी मुद्दाम लाऊन घेतलेल्या सवयी या इच्छा असूनही सुटत नाहीत.
माझ्या लक्षात आलेल्या काही वाईट सवयींची यादी मी खाली देत आहे. ज्यातल्या काही ठराविकच ह्या पुरुष किंवा स्त्रियांसाठी लागू असल्या तरी बहुतेक ह्या दोघानाही क्वामन आहेत.

१) भिंतींवर थुंकणे. (येथे थुंकू नये असा बोर्ड असेल तर मुद्दाम तेथेच...)
२) इंजक्शन ला घाबरणे. (१००% पैकी ८०%)
३) चष्म्याच्या वरून पाहणे. (मग का लावतात तेच कळत नाही)
४) फिल्म पाहत असताना स्वताला नायक / नायिका समजणे. 
५) घोरणे. (स्वतः आरामशीर झोपतात आणि दुसर्यांना त्रास देतात) [गेल्या आठवड्या पासून मीसुद्धा घोरतो (हिच्यासाराखेच) अशी ती तक्रार करत आहे पण माझा अजून विश्वास बसत नाही.]
६) नखं खाणे.
७) मराठी लोकांना भैय्ये समजून त्यांच्याशीच हिंदीत बोलणे.
८) गाडीत स्त्रियांनी स्त्रियांनाच बसण्यासाठी जागा न देणे. (हि तक्रार त्यांचीच असते.)
९) आपल्याच तंद्रीत चालत असताना बोटं मोजणे.
१०) फुकटचे (वायफळ) सल्ले देणे.
११) रांगेत ऊभे न राहता पुढे जाऊन नंबर लावणे.
१२) मुलगी नजरेआड जाई पर्यंत एकटक तिच्याचकडे पाहणे.
१३) ती कशी दिसते हे माहित असतानाही नवर्याला महिन्यातून ४-५ वेळा तोच प्रश्न विचारणे.
१४) नको तिथे हात लावणे / खाजवणे.
१५) लिहताना पेन / पेन्सील तोंडात घालणे.
१६) गरज नसताना गाडी जोरात चालवणे.
१७) वेळ व परिस्थिती न पाहता डर व आळस देणे.
१८) डोळे मिचकवणे.
१९) परिस्थितीचा विचार न करता गाणे म्हणणे.
२०) उधार घेतलेले पैसे वेळेवर परत न करणे.
२१) ऐकू येत असेल तरी प्रत्येक वेळी काय-काय म्हणणे.
२२) नेहमी सुट्टे पैसे मागणे.
२३) वस्तू जागेवर न ठेवणे (पुरुषांसाठी)
२४) दररोज ऑफिस ला जायला ऊशीर होतो तरी लवकर न उठणे.
२५) फोनची रिंग कर्कश ठेवणे व लवकर न उचलणे.
२६) सिग्नल तोडणे.
२७) सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे.
२८) ठरलेल्या वेळेत हजर न राहणे.
२९) पाणी वाया घालवणे. (विशेषतः स्त्रिया)
३०) दुसर्यांच्या वस्तूंचा गैरवापर करणे.
३१) मागून कोणी आवाज दिल्यास होकार न देणे.

वरील यादी हि नक्कीच अपूर्ण आहे. त्यात भर घालता आली तर आनंदच होईल. भ्रष्टाचार, व्यसन, गुंडगिरी यासारख्या अनेक सांगता येतील. पण आजच्या काळात त्या प्रतिष्ठेच्या मानल्या जात असल्यामुळे त्यांचा वाईट सवयींमध्ये समावेश करण्याची हिंमत मी करू शकत नाही. ३१ डिसेंबर ला आपण अशा चांगल्या सवयींची यादी बघणार आहोत ज्याचा आपल्याला नवीन संकल्पांसाठी मदतच होईल.
आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.........

रविवार, २६ डिसेंबर, २०१०

गांवाकडच्या गप्पा

गांवाकडच्या गप्पा
सम्या :- कथा तरफडणा होता रे रम्या ? १ घंटा झायेना तुन्ही वाट द्खी रहायानुत. बेवड्या भटुर पी संन्ही पडणा होता का काय कुठे ?
रम्या :- काय डांबर्या मारी रहायाना मी अर्धा घंटा पहिले तर इगउ आठे. कोन्ही बांडबिचू बी होत न्हई. इच्यार त्या पिंट्याले.
पिंट्या :- शिलगाडारे तथा तुम्न्ह्या गप्पासले. पहिले हाई सांगा कि गाडाबैल ना काही जुगाड झाया का न्हई ?
आप्पा :- कायभो कोणत्या एवढ्या बाता रंगेल शेतीस ?
रम्या :- दखा राजाले दिवाई माहितीज न्हई.
आप्पा :- काय झाये ?
रम्या :- शेवंता बाईना तमसा शे ना
आप्पा :- चला मी बी येस मंग. बाई बी घर न्हई शे तथाच टाईमपास करी ल्हेसु आजना दिन.
चिम्या :- बंट्या ! "गायछाप दे रे "
बंट्या :- फक्त चुना शे देऊ का ?
चिम्या :- तो काय तठे लाऊ का ?
सम्या :- हाई ल्हेरे मन्ही बी बन्हाव.
पिंट्या :- मी काय म्हणी र्हयणु- गाडानी सोय होत नशीन ते आत्तेज दुडक्या धरुत बाल्लास्म्हा लाक्सा. शार्तकत शे १० वाजे पर्यंत पोहोची जासुत.
सम्या :- झकामाराले !!! त्या दादाभून गाड्बयील आज घरच शे. तेन्हाम्हाच जाउत. व्हाय तंरे चिमाआप्पा जुपी ल्हय, आम्ही गांव भायेर त्या पिप्पय्ना झाडफा थांबथस.
रम्या :- जाऊद्यारे तथा, देन्हार न्हई तो. काल्दिन रात्ले तेन्हा धन्ड्यान शिंगड लाईट ना खाम्बाम्हा आटकीसन मुडी गये.
आप्पा :- बहिण पंचायत हुईगई सली जावानी. बंट्या! मंघना टाईम नि टी छामिया बी येयेल शे का रे ?
बंट्या :- माले काय इच्यारस मी काय सोंगाड्या शे का तठला ? बाळूमामा हजरिले जायेल होता तेलेच इच्यारी ये.
आप्पा :- शिल्गाड तेले तथा. पस्ला पडणा हुई तो वर तंगड्या करी सन.
सम्या :- एक आयड्या शे भो, भावाश्या घर शे का दखी या तेन्ही टुकटुकी खाली हुई त तिज ल्ही जाउत.
पिंट्या :- आरे तो कंजूसगांना तम्हासा साठे गाडी दिन का ?
सम्या :- तो काबर देन्हार न्हई तेन्हा बाप बी दिन. काल्दीनच बांगरूशेठ ना दुकानव्हर पावशेर जिलेबी खावाडी तेल्हे.
आप्पा :- तेले मरू द्या तथा. ती दखा कपाशीनि गाडी ई र्हायनी. तिलेच लटका सर्वाझन.
भुर्र्रर्रर्र .....................
(सर्व नांवे व घटना काल्पनिक आहेत.)

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

साडेसाती (शनी महाराजांची वक्रदृष्टी)

साडेसाती
(शनी महाराजांची वक्रदृष्टी)
मी ज्योतिषी नाही. आणि ज्योतिष शास्त्रावर माझा कधी विश्वास हि नव्हता. पण साडेसाती लागल्यापासून थोडी द्विधा मनस्थिती आहे. गेल्या एक वर्षापासून माझे कोणतेही काम पूर्ण होत नाही म्हणून घरातल्या श्रद्धाळू व्यक्तींनी ज्योतिषाला विचारले. तेव्हाच कळले कि माझ्यावर शनी महाराजांची अवकृपा झाली आहे. म्हणजे मला साडेसाती आहे. मग माझेही कुतूहल वाढले आणि त्यासंबधी माहिती मिळवायचे ठरवले. ती अशी.आयुष्यात प्रत्येकाला साडेसाती येतेच, ती कुणालाही टळत नाही. त्या त्या वेळी चंद्र राशी असणार्या राशीत शनी अडीच वर्ष राहत असतो. तीन राशींचे प्रत्येकी अडीच याप्रमाणे साडेसात वर्ष होतात म्हणून त्याला साडेसाती म्हणतात.त्या काळात संबधित व्यक्तीला आर्थिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही लोकांच्या मते अशा काळात काही लोकांची भरभराटी होते. आता तुम्हीच सांगा कि हि माझी भरभराटी आहे कि अधोगती ???
. लोक एका दिवसात घर घेऊन मोकळे होतात. मी तीन महिन्यापासून व्यवहार केला आहे पण अजूनही कागदपत्रांची पूर्तता होत नाही. एक अडचण गेली तर पुढची हात जोडून स्वागतासाठी तयार असतेच.

. एका वर्षात ७ ते ८ मोठ्या कंपन्यांसाठी प्लेसमेंट चे क्वाल आले पण मुलाखतीसाठी कुणीही बोलावले नाही.
. मुळव्याध सारख्या दुष्ट आजाराची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
. प्रत्येक वेळी पैशांच्या अडचणी येतात.
. ज्यांच्या भरवशावर कामे घेतो ते वेळेवरच नकार देतात.
६. एवढेच काय तर कुठल्याही रांगेत ४ तास जरी ऊभा राहिलो तरी जवळ जाताच कौन्तर बंद होते.
७. कितीही बचत केली तरी अनावश्यक खर्च वाढतच जातो.
८. १०० वेळा नकार देऊनही कंपनीने क्रेडीट कार्ड माझ्या गळ्यात मारलेच. आणि त्यावरही असम्बाधित चार्जेस लाऊन मला ते भरण्यास भाग पाडले.
९. मोठ्या मुश्किलीने बँक कर्ज पास झाले आणि लगेचच व्याज दर वाढले.
१०. कितीही प्रयत्न करून मार्केटिंग चे टार्गेट पूर्ण होत नाही.
मी जे करायला नको तेच करावेसे वाटते. आता हेच बघा अशा वेळी आपल्या खाजगी गोष्टी कुणासमोरही बोलू नये असे म्हणतात आणि मी हे काय करतोय ? (माझ्या या वक्तव्यावर तुम्ही हसू किंवा रडू नका नाहीतर अजून एक संधी महाराजांना मिळाली म्हणून समजाच.) अशा अनेक लहान-सहान गोष्टी असतील ज्या मला नेमक्या आत्ताच आठवणार नाहीत.
उपाय म्हणून काही लोक म्हणतात कि शनीचे दर्शन घ्यावे म्हणजे तो खुश होतो तर काहींच्या मते त्याला तोंडच दाखू नये नाहीतर त्याला राग येतो.
आता मला कळाले कि हिंदू धर्मात ३३ कोटी देविदेवता असूनही लोक शनिवारीच मारुतीच्या मंदिरात भली मोठी रांग का लावतात.एवढे घडल्यावर मी या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही तर काय करेन ? विश्वास ठेवावा किंवा ठेवू नये यावर पुराव्यासह ठोसपणे सांगणारा व्यक्ती मला अजूनही भेटला नाही.  आपली मौल्यवान प्रतिक्रिया द्यायला अजिब्बात विसरू नका.

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

तिचे काय चुकले ?

तिचे काय चुकले ?
नांव माया. दिसायला आकर्षक नसली तरी स्वभावाने गोड होती. बोलणे आणि वागणे एवढे लोभस होते कि समोरच्यावर छाप पडायलाच हवी. म्हणूनच तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ती हवी-हवीशी वाटायची. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अनेकांनी तिच्याकडे प्रेमाची मागणीही केली होती. पण ती साफ नकार द्यायची. लग्नाच्या उंबरठ्यावर उभी असतानाच एका पुरुषाशी तिची ओळख झाली. विशाल त्याचे नांव. तो तिच्याच कुणीतरी लांबच्या नात्यातला होता. तिच्यापेक्षा ७-८ वर्षांनी मोठा असेल. विशालच्या लग्नाला आता ४ वर्ष पूर्ण झाली होती. दोघानाही एकमेकांचे स्वभाव खूप आवडले आणि छान मैत्री झाली. महिन्यातून एकदा भेटणेही होऊ लागले. सहवास हवा हवासा वाटू लागला. घरात चांगली पत्नी असतानाही त्याचे मन नेहमी तिच्यातच गुंतून राहू लागले. तिच्यातही अचानकपणे बदल दिसायला लागले.
कशीतरी हिम्मत करून विशालने मायाला प्रपोज केले. तिलाही कदाचित तेच हवे होते म्हणून चटकन होकार दिला. दोघानाही आकाश ठेंगणे झाले. आता ते निर्धास्त झाले. दिवसातून ४ वेळा फोन वर बोलल्या शिवाय चैनच पडत नव्हते.
आत्तापर्यंत अर्धा डझन मुलांना नकार दिला होता आणि अशी अचानक लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात कशी पडली तिचे तिलाच आश्चर्य वाटायचे. ती म्हणायची कि प्रेमाला नेहमी ’लफड’ समजायची, तशा लोकांकडे नेहमी हीन दृष्टीने बघायची. पण आज मला कळले कि खर्या प्रेमात काय सुख असते. भेटण्यासाठी, बोलण्यासाठी, बघण्यासाठी मनाची जी तडफड होते त्यात सुद्धा सुखच असते याची अनुभूती यायला लागली. अजूनही तो ब्याचलरच आहे असा तिला भास व्हायचा.
विशालचे लग्न झाले होते म्हणून आपले हे प्रेम कधीही पूर्णत्वास जाणार नाही याची दोघानाही शाश्वती होती. पण प्रेम करणे सोडतील ते प्रेमीयुगुल कसले ? नशिबात असेल ते पुढे बघू म्हणून दुर्लक्ष करायचे. आपल्या अशा वागण्याने घरच्या लोकांना कसलाही त्रास व्हायला नको म्हणून खबरदारी घ्यायचे. आपण जे करतोय ते खूप चुकीचे आहे याची दोघानाही जाणीव होतीच. पण म्हणतात ना कि कळत होते पण वळत नव्हते. अशातच काही दिवस निघून गेले.
माया खूपच भावनिक होती, घरच्या लोकांना अंधारात ठेऊन आपण विश्वासघात करतोय असे तिला वाटू लागले. त्यांना शरमेने खाली मन घालावी लागेल अशी कोणतीही गोष्ट तिने विशाल सोबत केली नव्हती, याचा तिला जेवढा आनंद झाला तेवढाच मनस्ताप तिला त्यासोबत प्रेम करण्याचा होऊ लागला.
प्रत्येकवेळी धैर्याने वागणारी, कधीही कुणाला न घाबरणारी माया आज अचानक हळवी झाली. त्यानेही तिच्यावर खूप प्रेम केले होते म्हणून त्याला नकार देण्यास ती घाबरत होती. पण हीच गोष्ट जगाला माहित झाल्यावर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे तील वाटू लागले.
विशालने आपल्या भोळेपणाचा फायदा घेऊन आपल्याला फसवले असे तिला वाटायचे. तो एक लग्न झालेला पुरुष आहे त्याला कोण बोलणार ? आणि किती दिवस ? पण माझे काय ? लोक काय काय म्हणतील ?
शेवटी तिने निर्णय घेतलाच. आता यापुढे त्याच्यासोबत प्रेमाचे संबध ठेवायचेच नाहीत. तिचे भेटणे आणि फोनही बंद झाले. कुठलाही प्रतिसाद ती देत नव्हती, काही दिवसा नंतर आपण हे सगळे विसरू असे तिला वाटले.
तिच्या वागण्यातला बदल त्याच्या लक्षात केव्हाच आला होता. अनेकवेळा विचारूनही ती काहीच सांगायला तयार नव्हती. पण यापुढे मी प्रेम करू शकणार नाही एवढे म्हणायची. याचा विशालच्या मनावर खूप मोठा आघात झाला. ती आपल्यावर प्रेम करतनसेल तर जगायचे कशासाठी असे त्याला वाटू लागले. आपल्यासोबत मायाने प्रेमाचे नाटक केले, ती आपल्या भावनाशी खेळली असे त्याचे पक्के मत झाले. एवढ होऊनही ती मात्र अजूनही मैत्री करण्यास तयार होती. मला एक चांगला मित्र गमवायचा नाही असे ती म्हणायची. पण त्याने मैत्रीस साफ नकार दिला. कारण आयुष्यात तिचे कधीही तोंड बघणार नाही असा संकल्पच त्याने केला होता. एकमेकांना जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोघांमध्ये आज संशयाचे वावटळ उठले होते. असे असले तरी ते एकमेकांना कधीही विसरू शकणार नव्हते.


मित्रांनो अशा प्रकारच्या घटना जगात खूप पाहायला मिळतात. आपण ऐकतो आणि विसरतो. मित्रांसोबत घडली असेल तर शहाणपणाचे दोन शब्द सुनावतो. आणि स्वत बाबतीत घडली तर...................???
प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

मनातले मनापासून ..............

मनातले मनापासून ..............

एका लहान खेडेगावात माझा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. आई-वडील शेतात मजुरी करायचे, त्याच परीस्थित शिक्षण झाले. शहरातले जीवन, चालीरीती, सभ्यता ! या गावापेक्षा थोड्या भिन्न असल्या तरी प्रत्यक्ष पाहण्याचा व अनुभवण्याचा योग कधीच आला नव्हता. घरात एकटा मुलगा असल्याने परिस्थिती नसली तरी शक्य तेवढ्या लाडाने वाढवले होते.शेती नसल्यासारखीच असल्यामुळे कधीतरी शहरात जाऊन कारकुनी करावी लागणार हे पक्के माहित होते. इच्छा नसतानाही मी त्या दिवसाची वाट पाहत होतो. कारण ग्र्याजुएशन पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी नोकरी नव्हती व मुलगा एवढा शिकला तरी अजून घरीच आहे अशी लोकांची बोलणी ऐकावी लागायची.
शेवटी तो दिवस जवळ आला. एका ओळखीच्या माणसाने शहरात नोकरी दिली. माझ्याबरोबर सगळ्यांना खूप आनंद झाला. पण दिवस जवळ यायला लागला तशी उदासीनता वाढायला लागली. आई, वडील, भाऊ, बहिण, मित्र, गाव, शेती, निसर्ग ह्यांपासून दूर जाणार होतो. सासरी जाणार्या मुलीसारखी अवस्था झाली...मन खूप हळवे आणि संवेदनशी होतेना म्हणून कदाचित...पण मुलगा असल्यामुळे त्या परीस्थित रडताही येत नव्हते.
निरोप देण्यासाठी वडील शहरापर्यंत आले. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम पण आम्ही दोघेही कमी बोलणारे त्यामुळे अशा परिस्थितीत अजूनही शांत झालो. मनात कालवाकालव सुरु झाली, मन उचंबळून आले. सावकाराकडून आणलेले दोन हजार रुपये त्यांनी माझ्या हातावर ठेवले. निरोप देण्यासाठी त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता...(आणि तो फुटलाच असता तर त्या अगोदर अश्रू आले असते) हे मला कळले आणि ते तसेच न बोलता निघून गेले.त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे मी बघतच होतो..सर्व जीवनपट डोळ्यासमोर आला आणि मन भरून आले. आपण काहीतरी पाप केलाय त्यामुळे हि ताटातूट होतेय असे वाटले. असेच त्यांच्याबरोबर घरी निघून जावे असे वाटत होते.
शहरामध्ये नातेवाईक असले तरी त्यांच्याकडे राहायचे नाही असा सुरुवातीपासूनच निर्णय घेतल्यामुळे मित्रांमध्ये राहण्याची व्यवस्था केली.
नोकरीचा पहिलाच दिवस होता... तिथल्या लोकांची राहणी, बोलणे, हावभाव, कामाची पद्धत हे सर्व पाहून मनात न्यूनगंड निर्माण झाला. माझे राहणीमान एकदम साधे (गावठी) नवीन कपडे पण तेही जुन्या पद्धतीचे शिवलेले, विन न केलेली, पायात चप्पल, दाढी थोडी वाढलेली, प्रकृती सडपातळ...
क्वालेजात असतानाही माझी राहणी अशीच होती. झकपक राहण्यासाठी पैसा हवा होता आणि सुरुवातीपासूनच तो आमच्यावर नाराज होता. माझे विचार चांगले आहेत मग राहणीमान साधे असले तरी चालेल असा माझा समाज होता. (तो खरा असला तरी येथे कामात येणार नव्हता हे मला खूप उशिरा कळाले)
माझ्या ब्वास ह्या पंजाबी होत्या, त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व.. त्याचाही मला खूप त्रास झाला. माझ्यापेक्षाही थोडा जास्त अनुभव असलेल्या तीन बाया, त्या तिघीही स्वताल माझ्या ब्वासच समजायच्या. मनात येईल तशा बोलायच्या. खूप मनस्ताप होत होता. समजून घ्यायला कुणीच तयार नव्हते. कुठून यांच्यात अडकलो असे वाटायचे. यावेळी गावाकडची खूप आठवण यायची.
एक गोष्ट आहे ती इकडे सांगावी कि नाही याचा खूप विचार केला पण मी ती कधीच विसरू शकत नाही.नोकरीच्या पहिल्याच दिवशी बाईने वरच्या मजल्यावरील गोडाऊन मधून काही पेपर्स आणायला सांगितले, ते शोधायला मला दोन तास लागले. ते फ़ाईलच्या अगदी तळाशी असल्याने आणि मला फ़ाईल ओपन कशी करावी हे माहित नसल्यामुळे तसेच बाहेर ओढून काढले. त्यांची अवस्था पाहून त्या बिचार्यांना हसावे कि रडावे हेच काळात नव्हते. पण मला त्याचे अजूनही खूप वाईट वाटते.
एका दिवशी त्यांनी बाहेरून जेवण मागवले व ते आणण्यासाठी मला पाठवले. त्यावेळी खूप संताप झाला, स्वताची चीड आली. कोणत्याही परीस्थित कोणासमोर वाकणार नाही असा निश्चय केला होता पण इथेतर आपण यांची गुलामीच करतोय असे वाटायला लागले. आत्ताच त्यांना खडसावून सांगावे आणि अशा नोकरीला लाथ मारून निघून जावे असे वाटले. पण पुढे काय ???...मोठ्या मुश्किलीने एक नोकरी मिळाली आणि तीही अविचाराने घालवली तर..... खूप रडू आले.
लांबच्या नात्यातले मोठे भाऊ आहेत त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितले कि स्वताला कमी समजू नकोस, त्यांची वैयक्तिक कामे करावी लागतात याचा अर्थ तू त्यांच्यासमोर हलका ठरतोस असा अर्थ नको घेऊ. ती तुझात असणारी नम्रता आहे, चांगुलपणा आहे असे समजून काम कर..
सुरुवातीला खिशात पैसे नव्हते म्हणून पंधरा दिवस फक्त एक वेळ पाववडे खायचो. ऑफिसातली मुलगी म्हणायची कि मी तुमचा डबा आणत जाइन पण कुणाकडून काहीही घ्यायचे नाही म्हणून नकार दिला. पगार झाल्यानंतर रूम पार्टनर्स चे घरभाडे मीच देऊन टाकायचो जे अजूनपर्यंत मला परत मिळालेच नाही.
गावाकडची खूप आठवण यायची. महिन्यातून एकदा जायचो. खूप आनंद व्हायचा. आई काहीनाकाही देताच रहायची. निघताना गलबलून येत होत, पाय पुढे रेटत नव्हते. काहीतरी बहाणा करून प्रत्येकवेळी एक दिवसाची रजा वाढवायचो.
मी आता बदलतोय, राहणीमानही बर्यापैकी सुधारलेय, हाताशी येईल ते काम करण्याचे ठरवले आहे. आता माल कशाचा कमीपणा व अपमानही वाटत नाही. प्रत्येक वेळी मानाने विचार न करता तटस्थपणे राहायचे ठरवले आहे. संवेदनशील न राहता जास्तीत जास्त प्रोफेशनल कसे बनता येईल याचाच विचार करत आहे. मला आता गावाकडे करमत नाही. तिकडचे लोक म्हणतात कि "तू शहर्म्हा र्हैसनी बदली गया रे"  जे घडत आहे ते चांगले नाही असे वाटतेय पण ती एक काळाची गरज असेल कदाचित.................